घोषणांचा पाऊस पाडून आपले हंडे भरणार नाही, उद्धव ठाकरेंचा सरकारवर घणाघात

Foto

बीड- सध्या मराठवाड्यात दुष्काळ आहे. आता घोषणांचा पाऊस खूप होईल. घोषणांच्या पावसाने आपले हंडे भरणार नाहीत, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केली. मराठवाड्यातील दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेऊन दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्‍यांना व नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी शिवसेनेच्या वतीने शेतकर्‍याशी थेट संवाद साधत त्यांना अन्‍नधान्य आणि पशुखाद्याचे वाटप उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते जाहीरसभेत बोलत होते. 

 

यावेळी पर्यावरणमंत्री रामदास कदम, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार चंद्रकांत खैरे व स्थानिक नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, शिवसेना ही सतत शेतकर्‍यांसाठी लढा देत आली आहे. शेतकर्‍यांसाठी सत्तेत राहून सरकारविरुद् आवाज उठवत आहे. मी येथे आलो ते शेतकर्‍यांचे ऋण  फेडण्यासाठी. तुम्हाला जे वाटप करण्यात येत आहे त्यात माझे कर्तृत्व नाही हे सर्व काही तुमचेच आहे.

 

शिवसेनेला सत्ता असली काय नसली काय मात्र सेना गोरगरीब शेतकर्‍यांसाठी त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी लढत राहणार आहे. पूर्वी ‘साधू संत येती घरा तोचि दिवाळी दसरा’ अशी म्हण प्रचलित होती पण आता निवडणुकीच्या तोंडावर संधिसाधू आपल्या दाराशी येतील त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे, त्यांना त्यांची जागा दाखविली पाहिजे. राज्यातील शेतकरी उपाशी राहता कामा नये.जोपर्यंत शेतकर्‍यांना सोयीसुविधा दिल्या जात नाहीत तोपर्यंत सरकारला स्वस्थ बसू दिले जाणार नाही, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.